We Humanists

विज्ञान आणि अध्यात्म

· K Damodar· 13 min read

आजच्या तंत्रज्ञानयुगातही असलेलं अध्यात्माचं महत्व सांगणारा हा लेख लिहिला आहे. थोडक्यात विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही हा विषय किचकट, गुंतागुंतीचा व अनेक पदर व आयाम असलेला असल्याने लेख थोडा लांबला जाण्याची शक्यता आहे. असो. तर आता लेखास सुरुवात करू या.

आज अनेक आस्तिक/सश्रद्ध लोकांना वाटतं की वैज्ञानिक विचारसरणीने वागणारी व्यक्ती ही अध्यात्मिक नसतेच. तर अनेक नास्तिक/अश्रद्ध/उच्चशिक्षित लोकांना वाटतं की अध्यात्मिक असणं म्हणजे वैज्ञानिक विचारसरणीला फाटा देणे असेच होय. अशाच प्रकारच्या चर्चेमध्ये “विज्ञान आणि अध्यात्म” या शीर्षकाचा कवितावजा स्वरुपात मांडलेला एक मेसेज मला काही मित्रमंडळींकडुन प्राप्त झाला, ज्यात अध्यात्माचं महत्व सांगण्याचा प्रयत्न आहे. प्रथम त्या कवितावजा मेसेजमधील काही भाग ज्याच्याशी मी बहुतांश सहमत आहे, तो खाली दिला आहे.

विज्ञानामध्ये व्यासंग आहे, अध्यात्मामध्ये सत्संग आहे.

मान्य

विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे, अध्यात्मामध्ये दातृत्व आहे.

मान्य

विज्ञानामध्ये शक्ती आहे, अध्यात्मामध्ये भक्ती आहे.

मान्य

विज्ञानामध्ये प्रकल्प आहेत, अध्यात्मामध्ये संकल्प आहे.

मान्य

विज्ञानामुळे पुरुषार्थ घडतो, अध्यात्मामुळे परमार्थ घडतो.

मान्य

विज्ञानामुळे प्रतिष्ठा वाढते, अध्यात्मामुळे निष्ठा वाढते.

मान्य

विज्ञानामुळे संपन्नता प्राप्त होते, अध्यात्मामुळे प्रसन्नता प्राप्त होते.

मान्य

विज्ञानामुळे परिस्थिती बदलते, अध्यात्मामुळे मनःस्थिती बदलते.

मान्य

विज्ञानामुळे चातुर्य विकसित होते, अध्यात्मामुळे चारित्र्य विकसित होते.

मान्य

विज्ञानामुळे बाह्य सुख प्राप्त होते, अध्यात्मामुळे अंतरात्म्यातून सुख प्राप्त होते.

मान्य

विज्ञानामध्ये पराक्रम आहे, अध्यात्मामध्ये आत्मसंयम आहे.

मान्य

अर्थात विज्ञानामध्येदेखिल आत्मसंयम लागतोच; समस्यांवर विचार करताना, त्या सोडविताना कित्येकदा अनेक वर्षे कठीण व किचकट कार्य करावे लागते, यासाठी वैज्ञानिकास कमालीचा आत्मसंयम लागतो.

विज्ञानामुळे भौतिकता सुधारते, अध्यात्मामुळे नैतिकता सुधारते.

मान्य

अर्थात इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की नैतिकतेची संकल्पना देखिल काळानुसार बदलत जाऊ शकते, जाते आणि गेली पाहिजे देखिल. उदा. काही वर्षांपुर्वीच “स्त्रियांनी समाजात मोकळेपणाने वावरणे”, “स्त्रियांनी पैसे कमविणे”, ” स्त्रियांनी वेद वाचणे, गायत्री मंत्र म्हणणेच काय पण ऐकणे देखिल” अनैतिक कृत्य, पाप असे समजले जायचे.

इथे आपण पाहु शकतो की उपरोक्त बाबी या अनैतिक कृत्य वा पाप वगैरे नाहीत हे विज्ञान आणि अध्यात्म या दोहोंनीही समाजास दाखवुन दिले व समजाऊन सांगितले. येथे आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर व हितकारक असा संगम पहावयास मिळतो.

विज्ञानामुळे धन निर्माण होते, अध्यात्मामुळे समाधान निर्माण होते.

मान्य

विज्ञानामुळे प्रसिध्दी मिळते, अध्यात्मामुळे सिध्दी मिळते.

अमान्य.

इथे एक कथा आठवली – शिर्डीचे श्री. साईबाबा यांस अनेक सिद्धी प्राप्त होत्या असे त्यांचे भक्त मानतात. तर “अशाच एका सिद्धीच्या जोरावर त्यांनी (एकदा भिक्षेत तेल न मिळाल्यामुळे) तेलाऐवजी पणत्यांमध्ये पाणी घातले आणि त्या पाण्यावर दिवे पेटवुन दाखवले” अशी एक आख्यायिका भक्तजनांत प्रसिद्ध आहे.

पण असे कितीही सिद्ध-पुरूष जरी आले तरी आजची भारतापुढील पेट्रोल/डिझेल आयातीची समस्या ते सोडवू शकणार आहेत का? असा प्रश्न आपण आपल्यालाच विचारायचा असतो.

उदा. श्री. जग्गी वासुदेव ऊर्फ साधगुरू नामक एक स्वयंघोषित सिद्ध-पुरूष सद्गुरु म्हणुन प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचं उदाहरण बघा.[sd]

हे स्वयंघोषित सिद्ध-पुरूष सद्गुरु, अध्यात्मिकतेच्या नावाखाली, तांब्याच्या/दगडाच्या काही वस्तु तयार करून, त्या हजारो/लाखो रूपयांना स्वतःच्या ऑनलाईन शॉपिंग (ईशा शॉपी) साईटवरून विकतात. अर्थात आपण पाहु शकतो की फक्त त्यांचे (अंध)भक्तच अशा वस्तु इतक्या जास्त किंमतीला विकत घेत असणार. अर्थात कोणी काय आणि किती किमतीस विकायला ठेवावे व इतर कोणी त्या वस्तु त्या किमतीला विकत घ्यावे की न घ्यावे हा बहुतांश ज्याचा त्याचा प्रश्न आहे व ते कायदेशीर असेल तर त्यात फारसे गैरही नाही. जसे की एखादा फॅशनचा शर्ट वा कॉस्मेटिक वा एखादी बाईक/कार अशी वस्तु कोणी कितीला विकावी व ती इतर कोणी त्या किमतीला विकत घ्यावी की नाही हा एक असाच प्रश्न आहे.

परंतु इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की हे स्वयंघोषित सद्गुरु देखिल अशा तथाकथित अति-प्रभावशाली (हाय पॉवरफुल) अध्यात्मिक लेबल लावलेल्या वस्तू गरज पडतील तेव्हढ्या निर्यात करून त्याबदल्यात अब्जावधी डॉलर्सचं पेट्रोल/डिझेल आयात करू शकत नसतात. कारण यांच्या असल्या तथाकथित पॉवरफुल व अध्यात्मिक लेबल लावलेल्या वस्तुंचे प्रत्यक्ष जीवनात काहीही महत्व नसते. तिथेच आपण पाहु शकतो की अनेक पाश्चात्य देश, चीन आदि रूढार्थाने अध्यात्मिक नसलेले देश मात्र त्यांच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर तयार केलेल्या उच्च तंत्रज्ञान असलेल्या वस्तु/सेवा पुरवुन त्या बदल्यात त्यांना गरज असेल तेव्हढे पेट्रोल/डिझेल सहज घेऊ शकतात. त्यांना अमेरिकी डॉलर्सवर आपल्या इतके अवलंबुन रहावे लागत नाही. आपल्यासारख्या तथाकथित “उच्च अध्यात्मिक पॉवर”च्या अशा सिद्ध-वस्तु बनवणार्या देशाला मात्र अमेरिकी डॉलरच्या मागे फरपटत जावे लागते. कोणतीही सिध्दी तसेच कोणताही तथाकथित सिद्ध-पुरूष इथे काहीही चमत्कार करू शकत नाही. कोणताही सिद्ध-पुरूष त्याची कोणतीही अध्यात्मिक सिध्दी वापरून पेट्रोल/डिझेल (वा विमान/फायटर-प्लेन/मोबाईल-फोन आदि) तयार करू शकत नसतो. अशा जीवनोपयोगी वस्तू/तंत्रज्ञान बनवायला विज्ञानच लागते, तिथे अध्यात्माची गरजही नसते. अर्थात यामुळे देखिल अध्यात्माचं महत्व कमी होत नाही. कारण अध्यात्मात सिद्धी/चमत्कारास काहीही महत्व नसतं.

कारण सिध्दी/चमत्कार ही कल्पनाच मुळात थोतांडी स्वरूपाची आहे. जी अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या पुरोहितांना, पोप, फादर, मुल्ला, मौलवी, गुरू-महाराज, यांनाच फार गरजेची असते, कारण सिद्धींच्या अशा बाजारगप्पांचा त्यांना त्यांच्या धंद्यामध्ये भरपुर उपयोग होत असतो. अशा बाजारगप्पा हाणुनच तर त्यांना “समस्यांनी गांजलेले सामान्य लोक” स्वतःच्या कब्जात घेता येतात व त्यांच्याकडुन पैसे/वस्तु/धनधान्य आदि मनसोक्त लुबाडता येतात.

विज्ञानामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, अध्यात्मामुळे सर्व प्रश्न सुटतात.

अमान्य.

“विज्ञानामुळे नव्हे तर विज्ञानाच्या गैरवापरामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात” असं म्हणणं जास्त सयुक्तिक होईल. याप्रमाणेच अध्यात्माच्या गैरवापरामुळे देखिल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि होत आहेत हेदेखिल आपण पाहु शकतो. ओसामा-बिन-लादेन वा अबु-बकर अल बगदादी यांसारखे अल-कायदाचे वा इस्लामिक स्टेटचे अतिरेकी हे अध्यात्मिक (spiritual) विचारांनीच प्रेरित झालेले होते/आहेत हे आपण पाहू शकतो. आपल्याकडेही अध्यात्माचा गैरवापर करणारे अनेक लोक आहेत. उदा. एखाददुसरा अपवाद सोडून बहुतेक सर्व गुरू-महाराज, बापू-बाबा, सदगुरू, योगगुरू वगैरे.

दुर्दैवाने येथे आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म यांचा हिडिस व अहितकारक असा संगम पहावयास मिळतो. इस्लामिक स्टेट तसेच अल-कायदा आदि इस्लामच्या नावावर चालणाऱ्या अतिरेकी संघटनांमधिल लोकांचे लेख तसेच त्यांना प्रेरणादायी ठरलेल्या सईद कुत्ब या इस्लामी धार्मिक विचारवंताचे विचार मी वाचले. आपणही ते वाचल्यास आपल्याला त्यांच्या अध्यात्मिक प्रेरणेची कल्पना येईल.[sq] अर्थात “अध्यात्मिकतेची ही काळी बाजु” असंही कुणी याला म्हणु शकतात. पण मी म्हणेन की “अध्यात्मिकतेचा धार्मिक कट्टरतावाद्यांनी केलेला हा गैरवापर” आहे.

शिवाय “अध्यात्मामुळे सर्व प्रश्न सुटतात” असे म्हणणे देखिल चुकीचे आहे. काही लोकांची तशी एक भाबडी समजुत असते, पण प्रत्यक्षात “अध्यात्मामुळे सर्व प्रश्न सुटत नसतात”; अध्यात्मामुळे फारफारतर लोकांना एक प्रकारची मानसिक शक्ती काही प्रमाणात मिळु शकते एवढं आपण म्हणु शकतो. अर्थात असं असलं तरिही यामुळे अध्यात्माचं महत्व कमी होत नाही.

(last but not the least)

विज्ञान फक्त मरायच्या आधीच उपयोगी पडते. अध्यात्म मेल्यानंतरसुद्धा उपयोगी पडते.

अमान्य.

“अध्यात्म मेल्यानंतरसुद्धा उपयोगी पडते” ही देखिल काही लोकांची एक भाबडी समजुतच असते, कारण प्रत्यक्षात मेल्यानंतर आपलं नक्की काय होतं हा प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहे. अर्थात असं असलं तरिही यामुळे देखिल अध्यात्माचं महत्व कमी होत नाही, कारण अध्यात्माचं महत्व हे याहुन वेगळं आहे.

असं असेल तर मग अध्यात्माचं महत्व नक्की काय आहे? असा प्रश्न आपल्याला पडु शकतो. अध्यात्माचं महत्व –

स्वार्थ साधण्यासाठी परिस्थिती अनुकुल असतानाही एखाद्या व्यक्तीने स्वार्थाच्या पलिकडे जाऊन विचार का करावा? याचं उत्तर आजपर्यंत तरी विज्ञान देऊ शकलेलं नाही. एखाद्या व्यक्तीने स्वार्थ साधण्यासाठी परिस्थिती अनुकुल असतानाही निस्वार्थी/परोपकारी वागण्याचं कोणतंही फक्त तार्किक (रॅशनल) स्वरुपाचं (वैज्ञानिक) कारण आजपर्यंत तरी वैज्ञानिक स्तरावर पुर्णपणे देता आलेलं नाही. अर्थात असं असलं तरिही काही वैज्ञानिक याचं वैज्ञानिक स्तरावरील तार्किक कारण देण्याचा/शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढे कदाचित त्यांना यात यश येईलही परंतु आज तरी ते शक्य नाही. (उदा. सॅम हॅरिस, रिचार्ड डॉकिन्स आदि वैज्ञानिक विचारवंतांनी असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे जो स्तुत्य आहे.)

अध्यात्माचं महत्व जाणवतं, अधोरेखित होतं, ते इथेच.

आता कोणी म्हणेल की हेच तर सर्व धर्म आणि धर्मग्रंथ सांगतात ना? तसं नाही आहे.

अध्यात्म हे बहुतेक सर्व रूढ धर्माच्या पलिकडे आहे. अध्यात्म हे बहुतेक सर्व धर्मग्रंथांच्या क्षमतेच्या पलिकडील आहे, आणि ते कोणत्याच एका धर्माच्या धर्मग्रंथात बंदिस्त केले जाऊ शकत नाही. अध्यात्म हे आपल्याला फक्त स्वार्थाच्याच पलिकडं जाऊन नव्हे तर सर्व प्रकारच्या धर्मग्रंथांच्या व त्यांमधिल कर्मकांडं/रूढी/परंपरा यांच्या पलिकडं जाऊन विचार करावयास प्रवृत्त करू शकतं. अध्यात्म हे कर्मकांड नाही. अध्यात्म म्हणजे पॅन्ट-शर्ट टाकून धोतर-सदरा घालणे नव्हे, कारण अध्यात्मात पॅन्ट-शर्ट की धोतर-सदरा, ब्रिटिश की भारतीय यांना अजिबात महत्व नसते. अध्यात्म म्हणजे केस कापून टाकून टक्कल होऊन शेंडी ठेवणे नव्हे, कारण अध्यात्मात पॅन्ट-शर्ट की धोतर-सदरा, ब्रिटिश की भारतीय, शेंडी ठेवणे न ठेवणे यांना अजिबात महत्व नसते.

अध्यात्मिक मनुष्य “ऊस डोंगा परी, रस नव्हे डोंगा; काय भुललासी वरलिया रंगा” या संत श्री. चोखामेळा यांच्या या महान विचाराने तसेच संत श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज, श्री. एकनाथ महाराज आदि संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालणारा असतो. श्री. गौतम बुद्ध यांनी देखिल हे व याहुनही उच्च असे अध्यात्मिक विचार सांगितले आहेत. अध्यात्म हे कोणत्याही व्यक्तीला फक्त यावरून चांगले-वाईट ठरवत नाही की ती व्यक्ती काळी की गोरी, सधवा की विधवा, ब्राह्मण की ब्राह्मणेतर, मुस्लिम की काफिर, मांसाहारी की शाकाहारी, भारतीय की अभारतीय आणि अगदी आस्तिक की नास्तिक यावरून देखिल. आपल्याकडील भक्तीपंथातील संतांची शिकवण देखिल बहुतांश अशीच अध्यात्मिक आहे. (तसेच यामुळेच बुद्धाने सांगितलेला धर्म हा इतर बहुतेक सर्व धर्मांच्या तुलनेत अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरतो. कारण गौतमबुद्ध यांनी इतरांप्रमाणे “मी ईश्वराचा शेवटचा प्रेषित आहे त्यामुळे मी जे सांगणार तेच कायम राहिलं पाहिजे”, वा “मीच तेवढा ईश्वराचा मुलगा वा ईश्वराचा अवतार”, “मीच तेवढा गुरू”, “मी सांगितलेले विचार हेच फुल-ॲन्ड-फायनल”, वा “आमचे ग्रंथ हे अपौरुषेय (ईश्वराने दिलेले) आहेत त्यामुळे त्यात काही बदल केले जाऊच शकत नाहीत” असे न सांगता सर्वांना मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन, स्थलकालसापेक्ष योग्य असा विचार स्वतः करावयास सांगितले, एवढेच नव्हे तर गौतमबुद्ध यांनी हे देखिल सांगितले की “तुम्ही स्वत: बुद्ध होऊ शकता आणि तसे व्हा, तसे होण्याचा प्रयत्न करा.”) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अशाच प्रकारे अध्यात्मिक विचारांचे होते. त्यांचे “Buddha and his Dhamma” हे पुस्तक या संदर्भात वाचनीय, चिंतनीय आहे. रिचार्ड डॉकिन्स यांचं “Science in the Soul” व सॅम हॅरिस यांचं “Spirituality Without Religion” [धार्मिकतेशिवाय अध्यात्म] ही पुस्तकं देखिल या संदर्भात अत्यंत वाचनीय आहेत.[Buddha] [ss] [sh] याशिवाय अजुन एक कारण आहे असं अध्यात्म महत्वाचं असण्याचं. ते असं –

अध्यात्म हे आपणास बनिया/व्यापारी वृत्तीच्या आहारी जाण्यापासून वाचविते. अन्यथा बनियागिरी/भोगवादी वृत्तीच्या आहारी जाणे अटळ असते. बनिया वृत्ती ही काही व्यक्तींच्या स्वार्थासाठी हितकारक वाटत असली तरिही दुरचा विचार करता एकदा का अशी वृत्ती समाजात बोकाळली की ती पुढच्या पिढीच्या व पर्यायाने त्या समाजाच्या तुलनेने सत्वर नाशास कारणीभूत ठरते. दुर्दैवाने भारतात बनिया वृत्तीचे लोकच पुढारी बनत आहेत; ज्यामुळे भारताचे सामाजिकच नव्हे तर वैचारिक आणि वैज्ञानिक पातळ्यांवर देखिल अपरिमित नुकसान झालेले आहे, होत आहे आणि होणारही आहे. बनिया/व्यापारी वृत्तीच्या व्यक्तीस वाटत असते की सर्व काही पैशात मोजता येते व त्यामुळे सर्व बाबींचे मोल हे तसे पैशातच मोजले पाहिजे.

पण बनिया वृत्तीच्या व्यक्तीस हे समजत नसते की देवी (smallpox), पोलिओ यासारख्या भयंकर रोगासाठीची असलेल्या ज्या लसी (vaccines) तो आज ५-१० रुपये इतक्या स्वस्तात खरेदी करू शकतोय ती लस २००-३०० वर्षांपुर्वी एखादा बनिया/व्यापारी वा अगदी राजादेखिल अब्जावधी रूपये देऊन खरेदी करू शकत नव्हता. असे कित्येक धनाढ्य बनिये/व्यापारी वा सरदार/राजे देखिल अशा अनेक रोगांनी, लसी वा औषधे/इंजेक्शने/स्प्रे आदि उपचारांअभावी, मेल्याची अनेक उदाहरणे इतिहासात दिसतात ज्या लसी वा औषधे/इंजेक्शने/स्प्रे आदि उपचारांची किंमत आजच्या बनिया/व्यापारी व्यक्तीला वाटते की फक्त काही रुपये आहे व या वस्तु सहज दुकानांमध्ये विकत मिळतात.

या लसी वा औषधे वा तत्सम तांत्रिक सुविधा आपणांस आज मुळात उपलब्ध आहेत तेच आधिच्या पिढ्यांमधिल (मुख्यतः पाश्चात्य) लोकांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनकार्यामुळे व त्यासाठी आवश्यक असे वैचारिक स्वातंत्र्य तसेच आर्थिक पाठबळ पाश्चात्य लोकांनी तसेच पाश्चात्य समाजाने उपलब्ध करून दिल्यामुळे. रूढी-परंपरा अतिप्रिय असणारा तसेच पुर्वजांचा अत्याधिक अभिमान असणारा धर्मांध समाज वैचारिक स्वातंत्र्य देत नाही, देऊ शकत नाही कारण वैज्ञानिक संशोधनकार्यातुन अनेक असे विचार पुढे येत असतात ज्याने धार्मिक विचारांना मुळापासुन हादरे बसत असतात, अनेक धार्मिक विचार मुळापासुन उखडुन फेकले जात असतात.

उदा. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत ज्यात त्याने सांगितलं की हे जग, त्यातील सर्व प्राणी मानव आदि कुणी तयार केले नाही आहेत शिवाय सर्व जग, त्यातील प्राणी, झाडे, तारे, सूर्य, चंद्र वगैरे खास मानवासाठी धर्मग्रंथात (बायबल आदि) मध्ये सांगितल्याप्रमाणे कोण्या सर्वशक्तीमान ईश्वराने तयार केलेले नाहीत; केपलर, गॅलिलिओ आदि वैज्ञानिकांचा ग्रहगतिसंबंधीचा सिद्धांत ज्यात सांगितलं की धर्मग्रंथात (बायबल आदि) मध्ये सांगितल्याप्रमाणे हे विश्व पृथ्वीभोवती फिरत नाही; वा आर्यभट्टाचा चंद्रसूर्यग्रहणा संबंधीचा सिद्धांत ज्यात त्याने सांगितलं की चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे धर्मग्रंथात (वेद, शास्त्र, पुराणे आदि) मध्ये सांगितल्याप्रमाणे राहू-केतू वगैरे असुरांनी गिळल्याने होत नाहीत. आपण पाहु शकतो की यातल्या प्रत्येक वैज्ञानिकाच्या बाबतीत त्या त्या वेळच्या त्या त्या ठिकाणच्या धर्मसत्तेने आणि धर्मांध समाजाने अन्यायी तसेच दडपशाहीचीच भुमिका घेतलेली आहे.

अर्थात नंतर झालेल्या आमुलाग्र पुरोगामी वैचारिक बदलांनी युरोप व पाश्चात्य देशांतील समाज हा वैज्ञानिकांना/नागरिकांना वैचारिक स्वातंत्र्य देण्यास तयार झाला. वैचारिक बाबतीत आपल्याकडील समाज हा अजुन युरोप व पाश्चात्य देशांइतका प्रगल्भ झालेला नाही. तरीही आपल्या सुदैवाने स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे (मुख्यत्वे डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे) आपला देश धार्मिक अंधकारात लोटला गेला नाही व अनेक इस्लामी देश तसेच आफ्रिकी देश यांच्या तुलनेत आपण बर्यापैकी वैचारिक स्वातंत्र्य उपभोगु शकतो. आजही बहुतेक सर्व इस्लामी देशांमध्ये/समाजामध्ये वैज्ञानिकांना/नागरिकांना कसलेही वैचारिक स्वातंत्र्य दिले जात नाही.

आपण पाहु शकतो की धर्मसत्तेच्या आधीन असलेला मनुष्य/समाज वैचारिक स्वातंत्र्य देत नाही, देऊ शकत नाही तर बनिया/व्यापारी वृत्तीचा मनुष्य/समाज दूरगामी अशा वैज्ञानिक/शैक्षणिक/सामाजिक प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करूच शकत नाही कारण त्याला फक्त चटकन आणि तोही पैशातच परतावा मिळवुन देणाऱ्या बाबींमध्येच गुंतवणुक करण्यात रस असतो.

अशा ठिकाणीही बनिया वृत्तीवर लगाम घालण्यासाठी अध्यात्म अत्यंत गरजेचे ठरते. याशिवाय बनिया वृत्तीतुनच उपजणाऱ्या व बनिया वृत्ती फोफावण्यास मदत करणाऱ्या चंगळवादी/भोगवादी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी देखिल अध्यात्म अत्यंत गरजेचे ठरते. पाश्चात्य आणि अध्यात्मिक? असा एक प्रश्न इथे काही जणांना पडु शकेल.

आपल्यापैकी बहुतेकांना हे वाचुन आश्चर्य वाटेल की अनेक पाश्चात्य लोक हे अध्यात्मिक आहेत. याहुन जास्त धक्का बसेल अशी आश्चर्याची बाब म्हणजे आज अध्यात्मिक बाबतीत देखिल पाश्चात्य जग हे भारत तसेच अनेक इस्लामी/आफ्रिकी देशांच्या तुलनेत अनेक पटींनी पुढे गेले आहे. आपल्याकडील (अनेक इस्लामी देशांमधिल) तथाकथित धार्मिक नेते, स्वयंघोषित सद्गुरू, आदि छद्म-अध्यात्मिक लोक हे नेहमी पाश्चात्य लोकांवर टीका करताना दिसतात. त्यांच्या चंगळवादी/भोगवादी प्रवृत्तीवर मनसोक्त टीका करताना दिसतात. परंतु हे धार्मिक नेते, हे स्वयंघोषित गुरू-सद्गुरू वगैरे देखिल स्वतः आत्यंतिक भोगवादी आणि/वा संकुचित प्रवृत्तीचे आहेत हे अनेकदा दिसुन आलेले आहे.

पाश्चात्य जगातील अनेक व्यक्तींनी इतकं महान कार्य इतक्या निस्वार्थीपणे केलेलं आहे की विचारता सोय नाही. रिचार्ड स्टॉलमन हा जगद्विख्यात सॉफ्टवेअर तज्ञ एक अशीच अतुलनीय अध्यात्मिक व्यक्ती आहे. ज्याने केलेल्या महान निस्वार्थी कार्यामुळे आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात एकच नव्हे तर अनेक युगप्रवर्तक बदल घडले आहेत; ज्याची कल्पना कदाचित आपल्याकडील सॉफ्टवेअर क्षेत्रातील देखिल बर्याच जणांना नसेल. चारदोन वाक्यात त्याच्या कार्याची नीट ओळख करून देणे मला जमणार नाही पण सुरुवातीचा संदर्भ म्हणुन काही माहिती येथे देत आहे. GNU ही संस्था त्याने स्थापन केली व त्यामार्फत अनेकविध सॉफ्टवेअर त्याने लोकांना उपलब्ध करून दिले. ज्यामुळेच पुढे लिनक्स हे सॉफ्टवेअर देखिल लोकांपर्यंत येऊ शकले. प्रायव्हसी, नेट न्युट्रॅलिटी अशा अनेक मुलभूत समाजोपयोगी संकल्पनांना जन्म देणारा वा प्रेरणादायी ठरलेला रिचार्ड स्टॉलमन एक अद्वितिय व्यक्ती आहे. सामान्य लोकांमध्ये प्रायव्हसी तसेच नेट न्युट्रॅलिटी अशा अनेक समाजोपयोगी संकल्पना रूजविण्यासाठी त्याने यशस्वी प्रयत्न करणारी एक चळवळच उभी केली.[rs] धार्मिक शिकवणींमधील अध्यात्मिक खुजेपणा:

अध्यात्मिकतेच्या दृष्टिने आपण जेव्हा बहुतेक सर्व धर्मांच्या धार्मिक शिकवणी पहातो तेव्हा आपल्याला त्यांचा अध्यात्मिक खुजेपणा स्पष्टपणे जाणवतो. (यास सन्माननीय अपवाद बुद्ध धम्माचा आहे.) उदा. बहुतेक सर्व धर्म हे आपणांस स्वर्ग/हेवन/जन्नत (जिथे अमर्याद चंगळ आहे, जिथे अनेक प्रकारचे भोग, अनेक प्रकारची सुखं अमर्याद आहेत) अशांची लालुच दाखवतात.

इथे हे आवर्जुन लक्षात घेणं आवश्यक आहे की रिचार्ड स्टॉलमन हा नास्तिक आहे – परंतु तो इथल्या धार्मिक नेत्यांच्या, स्वयंघोषित गुरू-सद्गुरू यांच्या तुलनेत कित्येक पटींनी चांगला व उच्च दर्जाचा अध्यात्मिक व्यक्ती ठरतो. अर्थात आपल्याकडेही काही संत, समाजसेवक असे झालेले आहेत जे असे उच्च अध्यात्मिक होते. उदा. अनेक प्राचीन (विशेषतः उपनिषदकार) ऋषीमुनी (येथे आवर्जुन लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे उपनिषदांमध्ये वेदांमधिल कर्मकांड, तसेच स्वर्ग-संकल्पना आदिंचे केलेले खंडन आहे); गौतम बुद्ध; ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आदि संत तर आधुनिक काळातील तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आदि संत. याशिवाय महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. रानडे, आगरकर, आदि समाजसुधारकांनी देखिल अध्यात्मिक वृत्ती ठेऊन निस्वार्थीपणे कार्य केले आहे. डॉ. आंबेडकरांचं कार्य तर याबाबतीत अत्यंत महत्वाचं आहे व याचा सविस्तर उल्लेख वर केलेला आहे. (आपल्या देशाच्या दुर्दैवाने, संकुचित वृत्तीच्या काही ब्राह्मण्यवादी लोकांकडुन तसेच तितक्याच संकुचित तसेच अंधश्रद्ध वृत्तीच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांकडुन म. फुले, आंबेडकर आदि महान व्यक्तींना एकेका जातीपुरते बंदिस्त करून ठेवले गेले आहे.)

या महान लोकांनी अध्यात्मिक दृष्टिने खुजेपणाच्या अशा धार्मिक शिकवणींच्या पलिकडे जाऊन विचार केला हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या लोकांनी संकुचित धार्मिकतेला, धर्मांधतेला अव्हेरले आहे हे ही लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यावरूनही आपणांस दिसुन येते की अध्यात्म हे विज्ञानासच नव्हे तर संपुर्ण समाजासच पूरक ठरते ते यामुळे. वैज्ञानिकास अध्यात्माचं महत्व मान्य असतं ते मुख्यतः या मुद्यांमुळेच.

पण त्याचवेळी हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की बनिया/व्यापारी वृत्तीने भारताचे इतके वाटोळे करून ठेवले आहे की आज भारतात अध्यात्माचा देखिल बाजार मांडला गेलेला आहे बनिया वृत्तीच्या लोकांकडुन (अनेक गुरू-महाराज आदि). याचाच फायदा घेऊन कट्टर डावे, मार्क्सवादावर (लेनिनवादावर, माओवादावर) अंधश्रद्धा (होय, अंधश्रद्धा) ठेवणारे कम्युनिस्ट लोक संपुर्ण अध्यात्मालाच बदनाम करून फोल ठरविण्याचा प्रयत्न करताहेत व त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहेत. बहुतांश कट्टर डावे लोक हे कम्युनिझम, मार्क्सवाद आदिंबाबत तितकेच अंधश्रद्ध/सश्रद्ध असतात जितके बहुतांश कट्टर आस्तिक/धार्मिक लोक त्यांच्या धर्मग्रंथ, प्रेषित वा ईश्वर आदिंबाबत अंधश्रद्ध/सश्रद्ध असतात. अशा अंधश्रद्ध/सश्रद्ध असणाऱ्या कट्टर डाव्या लोकांना त्यांच्या धर्मग्रंथासमान असणाऱ्या ग्रंथांमधिल विचारांवर तार्किक चिकित्सा करून केलेली देखिल कसलीही टीका चालत नाही. तसेच अशा अंधश्रद्ध/सश्रद्ध असणाऱ्या कट्टर डाव्या लोकांना त्यांना प्रेषितासमान/अवतारी-पुरूषांसमान वंदनीय असणाऱ्या गतकालीन/समकालीन नेत्यांच्या संकुचित विचारांवर, स्वार्थी/क्रूर वर्तणुकीवर तार्किक चिकित्सा करून केलेली देखिल कसलीही टीका चालत नाही. साहजिकच कट्टर डाव्या लोकांच्या अशा अंधश्रद्धांचा गैरफायदा घेणारे अनेक स्वार्थी बुवाबाज/अतिरेकी लोक हे डाव्या विचारसरणीने चालणाऱ्या समुहांमध्ये/झुंडींमध्येही भरपूर दिसतात. “कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा” हा डॉ. अभिराम दिक्षित यांनी लिहिलेला लेख याबाबतीत चिंतनीय आहे. तो जरूर वाचा.[ad]

आपणास ही विनंती की हा लेख आपण आपल्या मित्र मंडळींना व आप्तस्वकीयांना वाचावयास द्यावा. आपले याबाबतीतील विचार देखिल कळवावेत. संपर्कासाठी माझा इमेल पत्ता खाली दिलेला आहे.

धन्यवाद. आभार.

के. दामोदर


संदर्भ / References